पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

ज्ञान वैराग्य भक्तीच्या सागरा स्नेहपल्लवा | तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा ||

ज्ञान वैराग्य भक्तीच्या सागरा स्नेहपल्लवा | तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा ||

विद्यारत्ना कृपावंता श्रीगुरो परितोषका |

तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा ||

साक्षात भगवद्रूपा महाभागवता वरा |

तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा ||

भगवान महाराजा द्या हो शरण लेकरा |

तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा ||

ज्ञान वैराग्य भक्तीच्या सागरा स्नेहपल्लवा |

तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा ||

                                           - चंद्रहासशास्त्री   

          मागच्या शतकात ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय साधून जीवन जगणारे असे अलौकिक महात्मे, थोर सत्पुरुष म्हणजे परम पूज्य श्रीगुरू भगवानशास्त्रीमहाराज सोनपेठकर. वंदनीय श्रीगुरुंना महाराष्ट्र शास्त्रीमहाराज या नावाने ओळखतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शास्त्री महाराजांची पुण्यतिथी माघ वद्य नवमी म्हणजेच श्री समर्थ रामदास नवमी यादिवशी अखंड हरीनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव या माध्यमातून संपन्न होते. त्यानिमित्त हा विशेष लेख......

हे तो एक संता ठायी | लाभ पायी उत्तम ||

म्हणविता त्यांचे दास | पुढे आस उरेना ||

कृपादान केले संती | कल्पांतीही सरेना ||

तुका म्हणे संतसेवा | हेची देवा उत्तम ||

जन्मभूमी सोनपेठ:

          सोनपेठ हे परभणी जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. वाना नदीच्या तीरावर हे गाव वसलेले आहे. असे सांगतात की, येथे सोन्याची मोठी बाजारपेठ होती. म्हणून या गावाला सोन्याची पेठ अर्थात सोनपेठ असे नामाभिधान प्राप्त झाले.  

सुवर्णपेठ क्षेत्र अवनी|

श्रीगुरू त्यास्थली प्रगटोनी|

दाविती सत्कर्म करूनी|

जगत्कल्याण मनी धरूनी||

वंश:

पवित्र ते कुळ पावन तो देश।

जेथे हरीचे दास जन्म घेती।।

          स्वामी श्रीयोगानंद महाराज या थोर शाक्तपंथी साधूंच्या वंशात शास्त्री महाराजांचा जन्म झाला.  शास्त्रीमहाराजांच्या आईचे नाव सजुबाई आणि वडिलांचे नाव यशवंतशास्त्री असे होते. मार्गशीर्ष, शु. एकादशी सन १८९२ रोजी सोनपेठ येथे महाराजांचा जन्म झाला. असे सांगतात की, शास्त्री महाराज हे त्यांच्या मातापित्यांचे पंधरावे अपत्य होते. आधीची चौदा अपत्ये जगली नाहीत. तेव्हा सजुबाई आणि यशवंतशास्त्री यांनी कठोर अशी तपश्चर्या केली. पूज्य सजुबाई जेव्हा गरोदर होत्या, तेव्हा पूज्य यशवंत शास्त्रींनी श्रीमद्भागवताची अनेक पारायणे केली.  या नंतर शास्त्री महाराजांचा जन्म झाला.

उपासना फळा आली, माता पिता धन्य झाले|

परम भागवत श्रीगुरू, भूलोकी या अवतरले ||

जन्मत: च महाराजांचे स्वरूप हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असे होते. त्या बालकाचे ओजस्वी रूप पाहून सहजच त्यांचे नाव भगवान असे ठेवण्यात आले.

 

विवाहः

परभणी जिल्ह्यातील मुद्गलेश्वर हे अत्यंत पवित्र आणि प्राचीन असे तीर्थक्षेत्र आहे. तेथे स्वामी श्री ऋषीकेशानंद हे थोर सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या वंशातील श्री दादामहाराज यांच्या कन्या सरस्वतीदेवी यांच्यासमवेत शास्त्री महाराजांचा विवाह संपन्न झाला.

. जोडोनिया धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेंच करी॥

उत्तमची गती तो एक पावेल। उत्तम भोगेल जीव खाणी॥

परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया॥

भूतदया गाई पशूंचे पालन। तान्हेल्या जीवन वनामाजी॥

शांतिरुपें नव्हे कोणाचा वाईट। वाढवी महत्त्व वडिलांचे॥

तुका म्हणे हेंचि आश्रमाचें फळ। परमपद बळ वैराग्याचें॥

अशा प्रकारचा शास्त्रसंमत आणि सत्कर्मपरायण अशा प्रकारचा दान, धर्म, तीर्थयात्रा, नित्य-नैमित्तिक कर्म यांनी युक्त गृहस्थाश्रम शास्त्री महाराजांचा होता. 

शिक्षणः

          संस्कृतचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडे झाले. त्यानंतर यशवंत शास्त्रींनी त्यांना सोनपेठ येथील एका सिख बांधवाच्या किराणा दुकानात नोकरी करावयास सांगितले. पण शास्त्री महाराजांचे अवतार कार्य भिन्न होते. त्यांना श्रीगुरुचरणाची ओढ लागली होती. त्यांनी तशी भावना सिख दुकानदाराकडे बोलून दाखवली. तेव्हा त्या सिख मालकांनी सांगितले की तुम्ही अवश्य पुढील शिक्षण घ्या. मी तुम्हाला पगार मात्र देत जाईन.

मज हृदयी सद्गुरू | तेणे तारिलो हा संसारपूरु।
म्हणऊनि विशेषे अत्यादरू | विवेकावरी ॥

          यानंतर महाराज परम पूज्य श्रीमद्गुरुवर्य श्री. शंकरशास्त्री शेळगावकर यांचेकडे गेले. श्रीमद्गुरुवर्य श्री शंकरशास्त्री हे तेव्हा सोनपेठ मुक्कामीच होते. त्यांचे मुळ गाव  शेळगाव महाविष्णू हे होते. तसेच ते स्वामी श्री ऋषीकेशानंद यांचे शिष्य होते. परम पूज्य श्री शंकर शास्त्री यांनी पुढे संन्यास घेतला. ही दीक्षा त्यांना स्वामी श्री ऋषीकेशानंद यांनी दिली. संन्यासानंतर त्यांचे नाव श्री शंकरानंद स्वामी असे झाले.  परम पूज्य श्री शंकर शास्त्री यांचेकडे शिक्षण घेताना महाराजांनी माधुकरी मागावी. आणि ती माधुकरी श्रीगुरू आणि त्यांचे सहाध्यायी असे सर्व जण सेवत असत. या वेळी श्री रंगनाथमहाराज (परभणीकर गुरुजी) हे महाराजांचे सहाध्यायी होते. या दोघांची मैत्री ही पुढे वारकरी संप्रदायात खूप प्रसिद्ध पावली. ते दोघे जणू

एकमेकांचे बहिश्चर प्राण होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोक त्यांना श्रीकृष्ण बलरामाची जोडी म्हणत असत.

बासर येथे अनुष्ठान:

असे सांगितले जाते की, शास्त्री महाराजांनी बासर येथे श्री सरस्वती मातेचे अनुष्ठान केले. त्यांना सरस्वती माता प्रसन्न झाली. शारदाम्बिकेने स्वप्नात येऊन त्यांच्या जिभेवर स्वहस्ते बीज मंत्र लिहीला. सोनपेठ परिसरातील शास्त्री महाराजांचे एक दोन मित्र देखील त्यांच्या समवेत बासरला गेले होते. असेही म्हटले जाते.

जन सांगती ऐसी कथा | नमियेली शारदा माता|

बासर तीर्थक्षेत्री अनुष्ठान| झाली विद्यादेवी प्रसन्न ||

वाराणसी येथील शिक्षण:

          परम पूज्य श्री शंकर शास्त्री यांचेकडील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भगवान महाराजांना पुढील शिक्षणासाठी वाराणसी येथे परम पूज्य धर्मप्राण श्री लक्ष्मणशास्त्री द्रविड यांचेकडे पाठवले.

द्रविड शास्त्री श्रीगुरू नमूनी |

सेवा त्यांची बहुत करूनी ||

परम पूज्य धर्मप्राण श्री लक्ष्मणशास्त्री द्रविड यांचे वाराणसी येथे शाळीग्राम सांगवेद विश्व विद्यालय आहे. ही संस्था आजही ज्ञानदानाचे कार्य करते. या प्रसंगी पंडितप्राण श्री राजराजेश्वरशास्त्री द्रविड हे शास्त्री महाराजांचे सहाध्यायी होते. यांच्या मैत्रीची चर्चा तर अखिल हिंदुस्थानात होत असे. दोघांमध्ये अतीव स्नेह होता.

          शास्त्री महाराज काशी येथे शिक्षण घेत होते, तेव्हा त्यांच्या मातोश्री आणि पत्नी त्यांच्या सोबत तेथे होत्या. काशीस जाण्यापूर्वी महाराजांचे पितृछत्र हरवले होते. एकदा महाराज सोनपेठ येथे आले. आणि तिकडे काशी येथे महाराजांच्या मातोश्री देवाघरी गेल्या. त्या काळी फोन इत्यादी व्यवस्था नव्हती. महाराज काशीला गेल्यावर त्यांना हा वृत्तांत समजला. तेव्हा मातोश्रींनी स्वप्नात येऊन महाराजांना दर्शन दिले. आणि आपल्याला सद्गती मिळाल्याचे सांगितले.

जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी|

शास्त्री महाराज काशी येथे शिक्षण घेत होते, तेव्हा सोनपेठमधील लोक वर्गणी करून त्यांना अर्थ सहाय्य करीत असत. या बद्दल महाराजांचे मनात सदैव कृतज्ञता होती. सोनपेठ येथील भगवती जगदंबेच्या मंदिर उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे सोनपेठ नगरीवर खूप प्रेम होते.

अध्ययन-अध्यापन:

चार वेद, अठरा पुराण, सहा शास्त्र, दर्शन न्याय व अद्वैत वेदान्त यांचे अध्ययन पूर्ण करून शास्त्री महाराज सुवर्णपेठ नगरीस परत आले. मातृभूमीला परतल्यावर महाराजांनी अग्निहोत्र स्वीकारले. तसेच तपाचरण, अनुष्ठान आणि ज्ञान दान हाच त्यांचा दिनक्रम असे. त्यांच्यामुळे धर्मप्राण परम पूज्य लक्ष्मण शास्त्री द्रविड यांची पाऊले सुवर्णपेठ नगरीस लागली.

जगदंबा भक्ती:

पवित्र मातृक्षेत्र धन्य वास पुण्य आश्रमीं ।
अंबदर्शनास भक्त अभक्त येति आश्रमीं ।
म्हणूनि विष्णुदास निजलाभ पावला फुका।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥

शास्त्री महाराजांचे कुलदैवत हे माहूर येथील श्रीरेणुकामाता होय. ते शक्तीचे महान उपासक असे घराणे. शास्त्री महाराज अनेकदा माहूरला जात असत. जगदंबेच्या प्रीत्यर्थ अनेक अनेक तपाचरण, अनुष्ठान त्यांनी केले.

मारोतीरायांची भक्ती:

          परभणी जिल्ह्यात गोदावरी मातेच्या तीरावर बारा हनुमंताची रामपुरी हे तीर्थक्षेत्र आहे. महाराजांच्या पूर्वजांनी तेथे फार मोठी तपश्चर्या केलेली आहे. शास्त्री महाराजांची येथील मारोतीरायांवर अतीव श्रद्धा होती. संत श्री तुलसीदासविरचित हनुमान चालीसा या ग्रंथाचा महिमा शास्त्री महाराज आवर्जून सांगत असत.

तपाचरण:

          माहूर, मुद्गल, राणी सावरगाव, वाराणसी, आळंदी, पैठण, पंढरपूर या तीर्थक्षेत्री शास्त्री महाराजांनी अनेक अनुष्ठाने केली. आजही तेथील लोकांमध्ये या गोष्टीची प्रसिद्धी आहे.

वाग्गद्गदा द्रवते यस्य चित्तं, रुदत्यभिक्ष्णम् हसति क्वचिच्च ।।

विल्लज्ज उद्गायति नृत्यते वा, मद्भक्तियुक्तो भुवनं पुनाति ।।

( श्रीमद्भागवत११/१४/२४)

भगवंत श्रीमद्भागवतात म्हणतात की, ज्याची वाणी माझ्या नाम, गुण आणि लीलांचे वर्णन करता करता गद्गद होते, ज्याचे चित्त माझ्या रूप, गुण, प्रभाव आणि लीलांचे चिंतन करतांना द्रवित होते, जो वारंवार (माझ्या वियोगाने) रडतो आणि (माझ्या संयोगाने) हसतो, कधी लोकापवादाचा विचार न करता उच्च स्वराने गायन करतो, (माझे नाम गात गात) नर्तन करतो अर्थात देहभान विसरून जातो, तो माझा भक्त या पृथ्वी मंडलाला पवित्र करतो. गुरुवर्य शास्त्री महाराजांची भक्ती सुद्धा याच कोटीतील होती.  

वारकरी सांप्रदाय स्वीकारः

          सोनपेठ क्षेत्री असताना एक दिवस त्यांना ज्ञानेश्वर माऊलींचा दृष्टांत झाला.

पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥
अवघें सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥

माऊलींनी त्यांना वारकरी संप्रदायाचा स्वीकार करण्याची आज्ञा दिली. त्या नुसार शास्त्री महाराजांनी  वारकरीपंथाचा स्वीकार केला. पंढरीक्षेत्री प.पु. वैष्णवशास्त्रींकडे त्यांनी काही काळ अध्ययन केले. तसेच प.पु. दादा महाराज साखरे यांचे ही श्रवण त्यांना घडले.

महाराज जेथे जेथे जात तेथे तेथे लोकांना सोप्या भाषेत उपदेश करीत. त्या उपदेशाचे सार म्हणजे:

भावे गावे गीत । शुद्ध करूनियां चित्त ।।

तुज व्हावा आहे देव । तरी हा सुलभ उपाव ।।

आणिकांचे कानी । गुण दोष मना नाणी ।।

मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा ।।

वेंची ते वचन । जेणे राहे समाधान ।।

तुका म्हणे फार । थोडा तरी परउपकार ।।

त्रियोग समन्वय:

          जीवनाच्या कल्याणासाठी ज्ञान योग, कर्म योग आणि भक्ती योग शास्त्रकारांनी सांगितला आहे. या तीनही योगांचा समन्वय शास्त्री महाराजांच्या जीवनात होते. त्यांनी श्रुती स्मृती पुराणोक्त धर्माचरण केले.

भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः।
ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्।।

( श्रीमद्भगवद्गीता १८.५५)

इया ज्ञानभक्ती सहज | भक्तु एकवटला मज | तो मीचि केवळ हे तुज | श्रुतही आहे ||

(ज्ञानेश्वरी १८.११३०)

या प्रमाणे ज्ञान आणि भक्ती यांचा सुरेख संगम त्यांच्या नित्य जगण्याचा भाग होता.

मैत्र जीवांचे:

          वै. वे.शा.सं. श्री. धारूरकर शास्त्री, वै. ह.भ.प. श्री. धुंडामहाराज देगलूरकर, वै. ह.भ.प. श्री. शंकरमहाराज खंदारकर, वै. वे.शा.सं. श्री. गोपाळशास्त्री गोरे, वै. वे.शा.सं. श्री. यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांचे शास्त्री महाराजांवर अतीव प्रेम होते. वै. ह.भ.प. रंगनाथ महाराज गुरुजी आणि पंडितप्राण राजेश्वरशास्त्री द्रविड या दोन विभूतींचा आणि त्यांचा स्नेह तर अवर्णनीय होता. वारकरी संप्रदायातील अजातशत्रू असे व्यक्तिमत्व त्यांचे होते.

वारकरी तत्वज्ञान प्रचारः

आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी ।

बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ॥

न्यायघटीत वेदान्ताचे प्रवक्ते म्हणून शास्त्री महाराजांची सर्वदूर प्रसिध्दी होती. अद्वैतसिध्दी सारख्या अनेक ग्रंथांवर त्यांचे अलौकिक प्रभूत्व होते. वाराणसी येथील अनेक विद्वत्सभांमध्ये विजयश्रीचे संपादन त्यांनी केले. अनेक वैदिक परिषदांचे ते अध्यक्ष होते. वै. विष्णूमहाराज कोल्हापूरकर गुरुजी, वै. श्रीकृष्णदास लोहिया महाराज, वै. अनंत महाराज सावंत, श्री निवृत्तीमहाराज वक्ते आदि अनेक मान्यवरांना त्यांनी ज्ञानदान केले. सांप्रदायिक प्रवचन, कीर्तन, भागवत, चातुर्मास, यज्ञयाग यांद्वारे वैदिक सनातन धर्मप्रसाराचे आणि वारकरी तत्वज्ञानाचे कार्य अनुष्ठानरूप मानून केले.

नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।
स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव।।

( श्रीमद्भगवद्गीता १८.७३)

तरी आता तुझी आज्ञा| सकळदेवाधिदेवराज्ञा|

करीन देई अनुज्ञा| भलतिये विषयी || 

(ज्ञानेश्वरी १८.१५७६)

अशा प्रकारची भूमिका असणारे श्रेष्ठ आणि उत्तम शिष्य शास्त्री महाराजांना लाभले.

त्यासाठी अखिल भारतभर भ्रमण त्यांनी केले. एकूण साठहून अधिक वर्षे त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले.

गुरु हा संतकुऴीचा राजा | गुरु हा प्राणविसावा माझा |
गुरुवीण देव दुजा | पाहता नाही त्रिलोकी ||१||
गुरु हा सुखाचा सागरू | गुरु हा प्रेमाचा आगरु |
गुरु हा धैर्याचा डोंगरु | कदाकाळी डळमळीना ||२||
गुरु वैराग्याचे मूळ | गुरु परब्रह्म केवळ |
गुरु सोडवी तात्काळ | गाठ लिंगदेहाची ||३||
गुरु हा साधकासी साह्य | गुरु भक्तालागी माय |
गुरु हा कामधेनु गाय | भक्तांघरी दुभतसे ||४||
गुरु घाली ज्ञानांजन | गुरु दाखवी निजधन |
गुरु सौभाग्य देऊन | साधुबोध नांदवी ||५||
गुरु मुक्तीचे मण्डन | गुरु दुष्टांचे दंडण |
गुरु पापाचे खंडन | नानापरी वारीतसे ||६||
काया काशी गुरु उपदेशी | तारक मंत्र दिला आम्हासी |
बाप रखुमादेविवरासी | ध्यान मानसी लागले ||७||

पुरस्कारः

पुरस्कार, प्रशंसा आणि प्रसिद्धी या पासून ते लांब राहत. त्यांनी अनेक पुरस्कार विनम्रपणे नाकारले. मात्र करवीर पीठाधीश्वर श्रीशंकराचार्य जेरेशास्त्री स्वामी महाराज यांच्याहस्ते विद्यारत्न उपाधीचा स्वीकार केला.  

महानिर्वाणः

पाच तपांहून अधिक काळ पर्यंत महाराज वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी अविरत परिश्रम घेत होते. प्रवास करीत होते. इ. स. १९८६ मध्येच महाराजांनी आता माझा इथला कार्यभार संपन्न झाला. आता मी देहत्याग करणार, असे स्पष्ट सांगितले होते. महाराजांच्या इच्छेनुसार सोलापूर येथील श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिरात ह.भ.प. श्री अप्पासाहेब ढगे यांनी निवासाची सोय केली. महाराज सपरिवार डिसेंबर १९८६ पासून तेथे राहत होते. माघ शुद्ध दशमीचे दिवशी महाराजांनी चंद्रहास महाराजांना तुळशी माळ घातली. भरभरून आशीर्वाद दिले.

माघ शुद्ध दशमी पाहोनि गुरुवार ।

केला अंगीकार तुका म्हणे ॥

त्या नंतर महाराजांनी दास नवमीच्या दिवशी महाप्रयाण करणार असल्याचे सांगितले.

सकळही माझी बोळवण करा। परतोनि घरा जावें तुम्ही।।

कर्मधर्मे तुम्ही असावें कल्याण। घ्या माझे वचन आशीर्वाद।।

वाढवूनि दिलें एकाचिया हातीं। सकळ निश्चिंती झाली तेथें।।

आता मज जाणें प्राणेश्वरासवे। मी माझिया भावे अनुसरलो।।

वाढविता लोभ होईल उशीर। अवघीच स्थिर करा ठायी।।

धर्म अर्थ काम झाला एकें ठायीं। मेळविला तिन्ही हातोहात।।

तुका म्हणे तुम्हां आम्हां हेचि भेटी। उरल्या त्या

गोष्टी बोलावया।।

या काळातही  गुरुमहाराजांचे नित्य कर्म सुरु होते. दि. २२ फेब्रुवारी १९८७, माघ व. नवमीचे म्हणजेच श्रीसमर्थरामदासनवमीचे दिवशी पूर्वकथनानुसार सकाळी आठ वाजून दहा मिनिटे वा. वयाच्या पंचाण्णवव्या वर्षी प्रसन्न चित्ताने, नामस्मरण करीत करीत आणि कोणत्याही व्याधीशिवाय  सोलापूर येथे देहत्याग केला. अखिल वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली. अनेक थोरा मोठ्यांनी श्रद्धासुमने अर्पण केली.

आम्ही जातो आपुल्या गावा । आमचा राम राम  घ्यावा ।।
तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी ।।

 

          गुरुवर्यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन परभणी, सोनपेठ, इ. अनेक ठिकाणी केले जाते. वै. आदरणीय ह.भ.प. श्री विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजींनी आपेगाव, संत ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मस्थान येथे वै. शास्त्री महाराजांची मूर्ती स्थापन केली आहे.

आम्ही चालवू हा पुढे वारसा:

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ।।
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥
तुका म्हणॆ मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥

श्रीगुरुमहाराजांच्या नंतर वै. ह. भ. प. श्री. रेणुकादासमहाराजांनी भागवत, अनुष्ठान इ. द्वारे या परंपरेचे संवर्धन केले.

अमृताची फळे अमृताचे वेली । ते  ची पुढे चाली बीजाचिहि ॥

आज गुरुमहाराजांचे नातू, श्री दुर्गादासमहाराजांचे चिरंजीव प्रा. डॉ. चंद्रहासशास्त्री महाराज ही धुरा सांभाळत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपालांचे हस्ते संस्कृतमधील प्राविण्याबद्दल इ.स. २००४ साली चंद्रहासशास्त्रींचा सत्कार करण्यात आला. उपनिषदांवरील त्यांनी संशोधनकार्य केले. त्यांची अनेक पुस्तके संस्कृत, मराठी इत्यादी भाषांमध्ये प्रसिद्ध आहेत. वै. श्रीगुरू महाराज आणि ब्र. भू. संत श्री रंगनाथ महाराज यांच्यावर श्रद्धा ठेऊन  प्रवचन, कीर्तन, भागवत, लेखन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वयाच्या चौथ्या वर्षी चंद्रहास शास्त्रींनी संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान, आपेगाव येथे पहिले प्रवचन केले. हे प्रवचन वै. ह.भ.प. श्री. विष्णूमहाराज कोल्हापूरकर गुरुजी यांनी आयोजित केले होते. आपेगाव येथे वै. कोल्हापूरकर गुरुजींनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहात दररोज प्रात:स्मरणीय श्रीगुरू शास्त्री महाराजांचे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या गाथेवर चिंतन संपन्न होत असे. एक दिवस आदरणीय कोल्हापूरकर गुरुजी श्रीगुरुंना म्हणाले की, आज आपल्या आधी थोडा वेळ आपल्या नातवाचे चंद्रहासचे प्रवचन आयोजित करू या, श्रीगुरुंनी या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली. चंद्रहासला आशीर्वाद दिले. दुपारच्या चारच्या सत्रात हे प्रवचन होते. आदरणीय कोल्हापूरकर गुरुजींचे शिष्य ह.भ.प. उत्तम महाराज यांनी चंद्रहासला खांद्यावर घेऊन माऊलींच्या सभा मंडपात नेले. आणि तिथून हा प्रवास सुरु झाला. ही आठवण सांगतांना आजही शास्त्रीजींना गहिवरून येते.

          प्रात:स्मरणीय श्रीगुरूमाऊलींबद्दल लिहावे तेवढे थोडे, सांगावे तेवढे थोडे, म्हणून या लेखाची समाप्ती आदरणीय श्री चंद्रहास महाराजांच्या आवडत्या अभंगाने करू या-

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव |  आपण चि देव होय गुरू ||
पढियें देहभावें पुरवितो वासना | अतीं तें आपणापाशीं न्यावें ||
मागें पुढें उभा राहे सांभाळीत | आलिया आघात निवारावे ||
योगक्षेम जाणे जडभारी | वाट दावी करीं धरूनियां ||
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं | पाहावें पुराणीं विचारूनी ||

 

सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू